ब्रेकिंग न्यूज

सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद.

दोन आरोपी ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात दुचाकीवरून येत नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाईत जेरबंद केले आहे. आष्टी परिसरात सलग घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास करत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी आष्टी परिसरात एक व्यक्ती पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करत २५ हून अधिक गुन्हेगार वस्त्यांची पडताळणी केली, हिस्ट्रीशीटरांची चौकशी केली तसेच १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीतील संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास गडया भोसले (वय २२, रा. चिखली, ता. आष्टी) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याचा साथीदार अरुण बप्पा काळे (वय २३, रा. बोलेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बीड जिल्ह्यातील किमान तीन सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास आष्टी पोलीस करत आहेत.

बीड जिल्ह्यात सोनसाखळी चोरांनी घातलेल्या धुमाकुळाला अखेर पोलिसांनी लगाम लावल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

ही कामगिरी नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, पोलीस उपअधीक्षीक बाळकृष्ण हनपुडेपाटील, उपविभाग आष्टी, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड, शरद भुतेकर पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आष्टी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे व पोलीस ठाणे आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक शिंदे, प्रविण क्षीरसागर, सत्यवान वाणी, तागड, तांबे चालक सिध्देश्वर मांजरे या सर्वांनी मिळुन केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button