ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडर टंचाई;सिलेंडरसाठी नागरिक परेशान.पुरवठा विभाग झोपेत!

ऑनलाइन बुकिंग नंतर पैसे भरून१५ ते २० दिवस सिलेंडर नाही; भर उन्हात नागरिकांच्या रांगा.

बीड शहरात मागील एक महिन्यापासून घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बीड शहरातील गुरुकृपा एचपी गॅस एजन्सीकडून ग्राहकांना दोन, तीन, चार, पाच अशा तारखा देऊनही वेळेवर सिलेंडर दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ग्राहकांकडून आधीच पैसे घेतले असून काहींकडून रिकामे सिलेंडरही जमा करून घेण्यात आले आहेत. मात्र १५ ते २० दिवस उलटूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

काही ग्राहकांनी दोन तारखेलाच ऑनलाईन पेमेंट भरल्याचे सांगितले. त्यानंतर “नऊ तारखेला मिळेल”, “आठ तारखेला देतो” असे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात अद्याप सिलेंडर मिळाले नसल्याची तक्रार आहे. गावाहून येणाऱ्या नागरिकांना तासन्तास थांबवून ठेवले जात असल्याने महिलांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बीड शहरातील काही हॉटेल्स व रेस्टॉरंटवर घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असल्याणे घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यात अनंत अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या बड्या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी होत आहे. परंतु याकडे पुरवठा विभाग डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे.

सध्या बीडमध्ये ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले असताना नागरिकांना उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅससाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागत असून एजन्सी चालक मनमानी करत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. पुरवठा विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन नागरिकांना नियमित गॅस पुरवठा करावा व घरगुती सिलेंडरचा वापर होत असलेल्या बड्या हॉटेलवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button