ब्रेकिंग न्यूज

रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात टायगर ग्रुप आक्रमक.

"त्या"एजन्सीला काळा यादीत टाकून खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा रस्तारोको : राकेश जाधव

बीड( प्रतिनिधी)बीड शहरालगत नाळवंडी नाका परिसरातून खंडेश्वरी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने टायगर ग्रुपने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. रस्त्यावर गुडघाभर खोल खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांनी संबंधित विभागाला निवेदन देत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या मार्गावर आदित्य इंजिनिअरिंग, कृषी व डेंटल महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा वाढली असून खराब रस्त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने दुचाकीस्वार वारंवार अपघातग्रस्त होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यावर खंडेश्वरी माता मंदिर असल्याने अनेक भावीक भक्त हे दर्शनासाठी खंडेश्वरी मंदिरात येत असतात त्यांना देखील या रस्त्याचा खड्ड्याचा त्रास होत असून तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.

टायगर ग्रुपने रस्त्याच्या दुरवस्थेसाठी संबंधित विभागाचे दुर्लक्ष आणि निकृष्ट दर्जाचे काम जबाबदार धरले आहे. अपघातप्रवण ठिकाणी तातडीने दुरुस्ती, आवश्यक सुरक्षा उपाययोजना, तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टायगर ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव आणि मराठवाडा अध्यक्ष पै. गोरक्षक उमेश भाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच याच खड्ड्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून संबंधित एजन्सीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही राकेश जाधव यांनी केली आहे.

 या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा  याच खड्ड्यासमोर रस्ता रोको करण्याचा इशारा टायगर ग्रुप जिल्हाध्यक्षष राकेश जाधवयांनी दिला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button