बीड शहरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट.
लेखी तक्रार देऊन देखील करवाई नाही,आजू बाजूच्या इमारती कोसळून दुर्घटना झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार.
बीड (प्रतिनिधी)बीड शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढत असताना नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून तीव्र होत आहे.
बीड शहरामध्ये जागोजागी अनधिकृत बांधकाम राजरोस सुरु असून नियमाची “ऐशी की तैशी”होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
सोमेश्वर नगरमधील रहिवाशांनी सन्दर नगर, बाशी रोड येथील सर्व्हे नं. 36, गट क्र. 3 मधील सुमारे 2170 चौ. फूट जागेवर सुरू असलेल्या अपार्टमेंट बांधकामाविरोधात नगर परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. केवळ 30 फूट रस्त्यालगत आणि अपुऱ्या जागेत सुरू असलेल्या या बांधकामामुळे परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला असून खोल पाया खोदकामामुळे बांधकामाच्या तिन्ही बाजूच्या इमारती खचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, समोरासमोर असलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परिसरात आधीच नाले व्यवस्था अपुरी असल्याने सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सदरील अपार्टमेंट बांधकाम सुरू असताना पाया नाली मध्येच कॉलम गेल्याची देखील दिसत आहे. अशा स्थितीत नव्या अपार्टमेंटमुळे हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बार्शी रोड परिसरासह बीड शहरातील अनेक भागात हॉटेल्स,दवाखाने, लॉज व इतर व्यावसायिक इमारती नियमांची पायमल्ली करून उभारल्या जात असल्याचे आरोप होत आहेत. शेकडो अनधिकृत बांधकामे व शेडचे काम सुरू असतानाही नगरपालिकेकडून एकावरही ठोस कारवाई होत नसल्याने लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जात आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रार देऊन देखील कारवाई शून्य! रहिवाश्यात संताप :
बीड नगरपालिका प्रशासन या अवैध बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधित बांधकामे थांबवावी,” व बाजूच्या इमारती खचून दुर्घटना झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाची असणार अश्या तीव्र प्रतिक्रिया सोमेश्वर नगरमधील नागरिकांनी व्यक्त केली.
नागरीकांची मागणी :
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अपुऱ्या जागेत सुरू असलेले अपार्टमेंट बांधकाम तात्काळ स्थगित करावे तसेच शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यावेळी या भागातील रहिवासी हनुमंत जगताप,डॉ.राजेंद्र बंड,नवनाथ अवघड प्रवीण सुरवसे, कैलास शेजाळ,विष्णू जगताप, किरण काळे,नवनाथ जगताप, मुद्राम ढवळे मनोज केदार, लक्ष ्मण जाधव,ज्ञानेश्वर गरड,संजय काळे,मधुकर शेळके नितीन काकडे कदम,सतीश राऊत,तांबडे सूर्यभान यासह अनेक नागरिकांचे स्वाक्षऱ्या आहेत









