साई मोबाईल शॉपी फोडणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद.
बीड स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील सुभाष रोडवरील साई मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या आरोपीकडून पुणे ग्रामीण व आहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.
दि. 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3.00 ते 3.50 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने साई मोबाईल शॉपीचे सेंटर लॉक व शटरचे कोंडे तोडून दुकानात प्रवेश केला होता. त्याने विविध कंपन्यांचे मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 84/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (ए), 331 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा कल्याण येथील सराईत गुन्हेगार रामनिवास मंजू गुप्ता (वय 37) याने केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तपासात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र व गुजरात राज्यात 50 हून अधिक मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष पथक गठीत करण्यात आले.
या पथकाने ठाणे, मुंबई, गोवा व गुजरात येथे शोधमोहीम राबवत अखेर दिवा (ठाणे) येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरीचे मोबाईल एका तिसऱ्या व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले.
पुढील तपासात आरोपीने आहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जिओमार्ट डिजिटल व मधु वाईन, तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर येथील एस.एस. मोबाईल शॉपी फोडल्याचेही समोर आले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास बीड शहर पोलीस करत असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, पोउपनि सुशांत सुतळे, पोह/सोमनाथ गायकवाड, मारूती कांबळे, अर्जुन यादव, बाळु सानप, पोअ/मनोज परजणे, अशफाक सय्यद, विकी सुरवसे, तसेच चापोह अतुळ हराळे व सिद्धेश्वर मांजरे यांनी पार पाडली.





