ब्रेकिंग न्यूज

नेकनूरमध्ये पोलीस ठाण्या समोरच दोन गटांत मारामारी दगडफेक. 

दुचाकी/रिक्षाच्या कटवरून वाद;दगडफेक तणावाचे वातावरण.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद शनिवारी (दि. 25 एप्रिल) रात्री उग्र रूप धारण करत दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीत परिवर्तित झाला. ही घटना सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नेकनूर पोलीस ठाण्यासमोर घडली.

प्राथमिक माहितीनुसार, दिवसा रिक्षाने कट मारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार व रिक्षातील व्यक्तींमध्ये वाद झाला. “कट का मारला?” याचा जाब विचारताच रिक्षातील दोघांनी संबंधित व्यक्तीस मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर वाद मिटवण्यासाठी आणि तक्रार देण्यासाठी एक गट पोलीस ठाण्यात गेला असताना दुसऱ्या गटाने तेथेच गोंधळ घालत वातावरण तापवले.

क्षणातच परिस्थिती बिघडत दोन गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या या तुंबळ हाणामारीमुळे काही काळ नेकनूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेमुळे पुन्हा जातीय तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नेकनूरमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भागातील लाईट बंद करण्यात आल्याची माहिती आहे.घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांकडून तात्काळ घटना स्थळ व नेकनूर पोलीस ठाणे परिसर, रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच बीड येथूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आल्याचे समजते.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button