नातू जन्मल्याचा आनंद,पण घरफोडीने धक्का.
४.५० लाख रोख व ४ तोळे सोने लंपास;घटनास्थळी पेठ बीड पोलीस दाखल.

बीड (प्रतिनिधी) एकीकडे घरात नातू झाल्याचा आनंद साजरा होत असतानाच दुसरीकडे घरफोडीच्या घटनेने जाधव कुटुंबाला मोठा आर्थिक धक्का बसला आहे. बीड शहरातील पेठ बीड परिसरात ही घटना घडली असून चोरट्यांनी घरातील सुमारे ४ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व ४ तोळे सोने लंपास केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ बीड भागात राहणारे सुनील अशोक जाधव यांना मुलगा झाल्यामुळे कुटुंबीय लातूर येथे नवजात बाळाला पाहण्यासाठी गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम व दागिने चोरून नेले.
ही रक्कम प्लॉट खरेदीसाठी साठवून ठेवली असल्याचे जाधव यांनी सांगितले. या घटनेमुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून आनंदाच्या क्षणीच दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून फिंगरप्रिंट घेतले असून पुढील तपास सुरू आहे. घरात कोणी नसल्याची माहिती मिळवून चोरट्यांनी रेकी करूनच ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.





