ब्रेकिंग न्यूज

ऑनलाइन ‘चक्री’ जुगारावर छापा.

52 हजाराच्या मुद्देमालासह एक ताब्यात;शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी.

बीड : शहरातील सम्राट चौक परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन ‘चक्री’ जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी (दि. २जुलै ) दुपारी छापा टाकून एका आरोपीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ५२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. यावेळी सम्राट चौकाजवळील एका पत्र्याच्या शेडसमोर ऑनलाइन ‘चक्री’ नावाचा जुगार खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन दुपारी सुमारे १.५० वाजता घटनास्थळी छापा टाकण्यात आला. छापा पडताच तेथे उपस्थित असलेले काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, पोलिसांनी किरण तेजराव घेवंदे (वय २९, रा. जिजामाता चौक, बीड) याला घटनास्थळी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो लॅपटॉपच्या माध्यमातून लोकांकडून पैसे स्वीकारून ऑनलाइन ‘चक्री’ नावाचा जुगार खेळवत असल्याची कबुली दिली. पंचांसमक्ष आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून २ हजार १०० रुपयांची रोख रक्कम, ५० हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, ५०० रुपये किमतीचा डेल कंपनीचा की-बोर्ड आणि ३०० रुपये किमतीचा लॉजिटेक कंपनीचा माऊस असा एकूण ५२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार अनिल घटमळ यांच्या फिर्यादीवरून किरण तेजराव घेवंदे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव काटकर, पोलीस अंमलदार सचिन आगलावे, अनिल घटमळ यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button