“तो खूनच”तीन दिवसातच उलगडा;नेकनूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.
अपघाताचा केला होता बनाव; सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासामुळे खुनच झाल्याचे निष्पण.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत उलगडा करण्यात नेकनूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आरोपींनी अपघाती मृत्यूचा बनाव रचून खून लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक व शास्त्रोक्त तपासामुळे हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे निष्पन्न झाले.
मयताचा मृतदेह त्याच्या वाहनासह रस्त्यालगत आढळल्याने सुरुवातीला अपघात झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. तथापि, घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष यामध्ये विसंगती आढळून आल्याने नेकनूर पोलिसांनी तपास अधिक सखोल केला. मयताच्या भावाने या अपघातावर संशय व्यक्त करून गळ्याला असलेल्या वनामुळे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केज वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने रात्रंदिवस मेहनत घेतली. तपासादरम्यान मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), लोकेशन विश्लेषण, CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले.
तपासात आरोपींनी पुरावे नष्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. मात्र पोलिसांनी प्रत्येक धाग्याचा तपास करून आरोपी फरार झाल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर विशेष पथके रवाना करण्यात आली आणि गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करून त्यांना तळोजा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा बीड, तळोजा पोलीस स्टेशन पनवेल येथील सपोनि निलेश येवले व त्यांचे पथक, टेक्निकल सेलचे विकी सुरवसे तसेच इतर यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणताही ठोस सुगावा नसताना अपघाती मृत्यूचा बनाव उघड करून अवघ्या 03 दिवसांत खून प्रकरणाचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपाधीक्षक वेंकटराम, नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश साळवे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे सफौं.संजय गुंड, पोह / दत्ता बळवंत, विशाल क्षीरसागर, मन्सूर शेख, गणेश परजने, बाबासाहेब साळुंखे, पोशिं बालाजी ढाकणे, सुधाकर जायभाये यांनी पार पाडली.






