ब्रेकिंग न्यूज

गेवराई वसंतनगर तांड्यात भीषण आग.

जनावरे जळून मृत्यू,कडब्याची गंज जळून खाक;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज.

बीड(प्रतिनिधी)बीड गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे वाढत्या उष्णतेमुळे अचानक भीषण आग लागून अनेक शेतकऱ्यांच्या गोट्यांमधील गाय, वासरे, घोडे आणि शेळ्या जळून मृत्युमुखी पडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की तांड्यातील ग्रामस्थांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ करावी लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने जनावरे वाचवण्यासही वेळ मिळाला नाही. अनेक मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबे दुःखात बुडाली आहेत.

घटनेची माहिती मिळताच राहुल चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्याला गती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी जनावरे हीच उपजीविकेचा मुख्य आधार असतात. दूध व्यवसाय, शेतीची कामे आणि दैनंदिन आर्थिक गरजा या जनावरांवरच अवलंबून असतात. त्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडल्याने संबंधित शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, नुकसानभरपाई व पुनर्वसनासाठी विशेष सहाय्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. मुक्या जनावरांचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असून नुकसानग्रस्त कुटुंबांप्रती सर्व स्तरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button