पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ शिवाजीनगर ठाणे प्रमुख.
सकाळी केजला बदली,दुपारी बीड शिवाजीनगरला नियुक्ती!

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आज जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांच्या बदल्यांमध्ये मोठी खांदेपालट करण्यात आली असून, काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या बदलीचा विषय विशेष चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बल्लाळ यांची बदली केज येथे झाल्याचे स्पष्ट झाले होते.तर केज येथील पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे हे बीड शिवाजीनगर येथे बदली करण्यात आली होती मात्र, दुपारपर्यंत परिस्थितीत अचानक बदल झाला आणि त्यांची नियुक्ती बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर आली. या अचानक झालेल्या बदलामुळे पोलीस वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस निरीक्षक बल्लाळ हे शिस्तप्रिय, कडक आणि कामात काटेकोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी विविध ठिकाणी प्रभावी कारवाई करून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कारभारात त्यांच्या नियुक्तीनंतर काय बदल घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शितल कुमार बल्लाळ हे बीड शहर पोलीस ठाणे प्रभारी असताना त्यांच्या अवैध धंद्यावाल्यांनी चांगला धसका घेतला होता.
दरम्यान, जिल्ह्यातील बदल्यांमध्ये अनेक ठाणे प्रमुखांची जबाबदारी बदलण्यात आली असून काही ठिकाणी पुन्हा खांदेपालट करण्यात आल्याने प्रशासनातील हालचालींना वेग आला आहे. बल्लाळ यांच्या अचानक बदललेल्या नियुक्तीची चर्चा मात्र बीड जिल्ह्यात रंगताना दिसली.






