ब्रेकिंग न्यूज

मारहाण केल्याने कामगाराचा मृत्यू ? पत्नीचे गंभीर आरोप.

आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार,मयताची पत्नी काय म्हणाली पहा!

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील नगर रोड मुख्य रस्त्यालगत पत्र्याच्या शेडमध्ये कथितपणे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कामगाराला मालकाने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

मृत व्यक्तीचे नाव उमेश नवनाथ दळवी (वय 38वर्ष रा.नगररोड,गोरे वस्ती, बालेपीर, बीड) असे असून, ते गेल्या दोन वर्षांपासून संबंधित शेडमध्ये कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली.

पत्नीच्या आरोपानुसार, 23 मे शनिवारीच्या मध्यरात्री उमेश दळवी यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मयताच्या पत्नीने सांगितले की, रात्री सुमारे तीन वाजता फोन करून “उमेश यांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले आहे,” अशी माहिती देण्यात आली होती. मध्यरात्र असल्याने त्या सकाळी शासकीय रुग्णालयात पोहोचल्या असता, उमेश यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मयताच्या पत्नीने उमेश यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा व वळ असल्याचा आरोप केला असून, त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, मयताची आई व इतर नातेवाईक पुणे येथे वास्तव्य असून ते पुण्यावरून बीडला येत असून, त्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले. या वृत्ताला प्रसिद्धी मिळेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

पोलिस तपासा व शवविच्छेदा नंतरच मृत्यूचे सत्य कारण आणि आरोपांमागील स्पष्ट होईल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button