ब्रेकिंग न्यूज

बीड जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट.

शितलकुमार बल्लाळ केज; प्रवीण कुमार बांगर कंट्रोलला,घोळवे बीड शहर,उनवणे शिवाजीनगर ठाणे प्रमुख.

बीड | प्रतिनिधी (दि.25) — बीड जिल्हा पोलीस दलात मोठी प्रशासकीय खांदेपालट करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी रविवारी (दि.24) पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन ठाणेप्रमुखांची नियुक्ती झाली आहे.

बदली प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचाही विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः बीड शहर, केज, पाटोदा, शिवाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदल झाल्याने पोलीस वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीड शहर पोलीस ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांची बीड शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, केज येथील पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच होम डीवायएसपी पदावर कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना पाटोदा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजर्मे यांची केज येथून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे यांची धारूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर पोलिस उपनिरीक्षक रमेश घुले यांची बर्दापूर येथून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रमुख बदल्यांव्यतिरिक्त तब्बल ३२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्याही करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे कामकाज अधिक गतिमान, प्रभावी व शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने ही खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button