आरोपीला तात्काळ अटक करा;अन्यथा आत्मदहन” कुटुंबीय आक्रमक.
मृतदेह घेऊन नातेवाईक थेट SP ऑफिसमध्ये दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील नगर रोड परिसरात राहणारे उमेश नवनाथ दळवी (वय 38) यांच्या मृत्यू प्रकरणाने रविवारी मोठा तणाव निर्माण झाला. उमेश दळवी हे नगर रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये दारू विक्रीच्या ठिकाणी काम करत होते. त्यांना मालकाने मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केला असून, या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सोमवारी (दि. 25) शवविच्छेदनानंतर संतप्त नातेवाईक आणि कुटुंबीयांनी मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “आरोपीला तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही आत्मदहन करू,” असा इशारा कुटुंबीयांनी दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर उपस्थित होते. त्यांच्या समोरच नातेवाईकांनी संताप व्यक्त करत आरोपीच्या तात्काळ अटक करा नाहीतर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देखील यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी दिला.
स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून बीडचे पोलीस उपाधीक्षक वेंकटरमना यांनी घटनास्थळी येत नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला.
या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडाली असून, आरोपीला अटक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








