उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांचा भाजीविक्रेत्या आजीला मायेचा आधार.
आजीच्या घरी जाऊन आर्थिक मदत करत साडी चोळी देऊन केला सन्मान.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान भाजी विक्रेत्या दळवी आजींना झालेल्या वागणुकीनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष Vinod Muluk यांनी पुढाकार घेत दळवी आजींच्या घरी जाऊन त्यांना मायेचा आधार दिला.
काही दिवसांपूर्वी भाजी मंडई परिसरात अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान दळवी आजींचा भाजीपाला, साहित्य तसेच जेवणाचा डबा ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. राज्यभर या घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी आज सकाळी दळवी आजींच्या घरी भेट देत त्यांचा सन्मान केला. यावेळी साडी-चोळी तसेच १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. दळवी आजी या बीड शहरातील कब्बाड गल्ली परिसरात वास्तव्यास असून, आडतीवरून भाजीपाला खरेदी करून भाजी मंडईत विक्री करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
यावेळी बोलताना विनोद मुळूक यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईबाबत दिलगिरी व्यक्त केली व “यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही निःस्वार्थपणे मदतीसाठी कायम सोबत राहू,” असा शब्द दिला. यावेळी आजीच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. हा क्षण पाहून सर्वच भावनिक झाले होते
बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून जालना रोड, बार्शी रोड, नगर रोड तसेच विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. भाजी मंडई परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र दळवी आजींवरील कारवाईची पद्धत चर्चेचा विषय ठरली होती.
या भेटीदरम्यान नगरसेवक महेश धांडे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.









