ब्रेकिंग न्यूज

आशीर्वाद लॉन्स विवाह सोहळ्यातील आतषबाजीत फोटोग्राफर गंभीर जखमी.

लाखोंचे साहित्य भस्मसात;आयोजकांसह संबंधितांवर कारवाईची मागणी.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोड परिसरातील एका विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या धोकादायक फटाकेबाजीमुळे गंभीर दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात एका फोटोग्राफरला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे लाखो रुपयांचे व्यावसायिक साहित्यही आगीत नष्ट झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित आयोजक व फटाके व्यवस्थापन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

माहितीनुसार, सोमेश्वर मंदिर परिसरामागील आशीर्वाद मंगल कार्यालयात २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या विवाह सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ही फटाकेबाजी आवश्यक सुरक्षा उपायांशिवाय व नियमांचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररीत्या भाजले गेले असून त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. दुर्घटनेत त्यांचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे कॅमेरे, लेन्स आणि इतर उपकरणे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटरही किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, लोकवस्तीच्या भागात अग्निसुरक्षेची योग्य व्यवस्था, अधिकृत परवानग्या किंवा प्रशिक्षित कर्मचारी नसताना फटाके उडवण्यात आले. त्यामुळे लग्नासाठी उपस्थित नागरिक, महिला, लहान मुले आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता.

विशेष म्हणजे, जखमी फोटोग्राफर यांच्या स्वतःच्या विवाहाला अवघे काही दिवस बाकी असताना ही दुर्घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि आर्थिक ताण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संबंधित कार्यक्रमस्थळी विनापरवाना मद्यसाठा असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून आयोजक, इव्हेंट व्यवस्थापक, फायरवर्क व्यावसायिक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तसेच जखमींना न्याय मिळावा, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी मंगल कार्यालयांमधील धोकादायक फटाकेबाजीवर कठोर नियम लागू करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button