ब्रेकिंग न्यूज

गेवराईत रात्रीतून उभारला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

आंबेडकरी जनतेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण.

गेवराई (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात आज पुन्हा एकदा ‘रात्रीतून पुतळा उभारण्याचा’ प्रकार समोर आला असून, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंचायत समिती कॉर्नर येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अज्ञात कार्यकर्त्यांनी रात्रीच्या अंधारात स्थापन केला आहे. सकाळी ही बाब लक्षात येताच शहरात मोठी खळबळ उडाली असून आंबेडकर प्रेमींनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पंचायत समितीच्या कोपऱ्यावर (कॉर्नर) बऱ्याच दिवसांपासून पुतळा बसवण्याची मागणी केली जात होती. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय परवानग्या अभावी हे काम प्रलंबित होते. अशातच, काल मध्यरात्री काही अज्ञात कार्यकर्त्यांनी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सन्मानपूर्वक स्थापित केला. पुतळ्याची स्थापना केल्यानंतर पहाटेच्या सुमारास जेव्हा नागरिकांना याची माहिती मिळाली, तेव्हा परिसरात “जय भीम”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.रात्रीतून पुतळा बसवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक प्रशासनासह पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेवराईमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारे रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांचे पुतळे उभारण्याचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून आता काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुतळा स्थापन झाल्याचे समजताच शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनुयायांनी घटनास्थळी धाव घेतली. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा केला जात आहे. “आमच्या दैवताचा पुतळा शहराच्या मुख्य चौकात सन्मानाने उभा राहिला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” अशी भावना यावेळी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.विनापरवाना पुतळा उभारल्याप्रकरणी पोलीस प्रशासन आता कायदेशीर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता हा प्रश्न सामोपचाराने सोडवला जावा, अशी विनंती स्थानिक नेत्यांनी केली आहे. सद्यस्थितीत परिसरात शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button