पेट्रोल-डिझेल साठेबाजांवर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू – संदीप उबाळे
इंधन दर वाढणार असल्याने साठेबाजी करणाऱ्या पंप चालकावर कारवाई करून परवाना रद्द करा.

बीड(प्रतिनिधी)बीड शहर व तालुक्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर काही पेट्रोल पंप चालकांकडून इंधनाचा साठा केला जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप उबाळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिला आहे.
“पेट्रोल पंप चालकांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यासाठी इंधन साठवणूक सुरू केली असल्यास, पुरवठा विभागाने तात्काळ धडक कारवाई करावी. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागल्यास आम्ही शांत बसणार नाही,” असा स्पष्ट इशारा उबाळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
तसेच, “जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर आम्ही स्वतः पेट्रोल पंपांची झाडाझडती घेऊ. कुठेही बेकायदेशीर साठा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही मागे हटणार नाही,” वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू असा इशाराही उबाळे दिला.
आज बीड शहरातील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, परंतु अचानक पेट्रोल व डिझेल बंद केल्याने नागरिकाच्या रोशाला पंप चालकाला सामोरे जावे लागले होते.दरवाढीच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत साठेबाजीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि इंधन साठेबाजी करणाऱ्या पंपचालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवा नेत संदीप उबाळे यांनी आहे.





