बीड मधील पंपावरील डिजल संपले ?
"नॉन स्टॉक” फलक वाहनधारक हैराण;वाहनाच्या लांबच लांब रांगा.

बीड (प्रतिनिधी):बीड शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डिझेलच्या तुटवड्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून अनेक पेट्रोल पंपांवर “नॉन स्टॉक”चे फलक झळकताना दिसत आहेत. परिणामी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील एक महिन्यापासूनच पेट्रोल-डिझेल पुरवठा अनियमित असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण परिसरातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असून त्याचे पडसाद स्थानिक बाजारात उमटताना दिसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. काही पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध असले तरी तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर अनेक पंपांनी थेट “नॉन स्टॉक”चे फलक लावल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच पावसाळा काही दिवसांवर आला असल्याने शेतकऱ्यांनी शेतीतील कामे सुरू आहेत शेतकऱ्यांना शेतीतील कामे करण्यासाठी ट्रॅक्टर लागत असेल त्याला देखील मिळत नसल्याने शेतकऱ्याची देखील कामे खोळंबली आहेत.
डिझेलअभावी मालवाहू वाहने ठप्प झाली असून, पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात हा तुटवडा निर्माण झाल्याने प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून डिझेलच्या किमतीत ४ ते ५ रुपयांनी वाढ होण्याचे संकेत मिळाल्याने काही पेट्रोल पंप चालकांकडून साठेबाजी होत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. याबाबत पुरवठा विभागाने तात्काळ चौकशी करून परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोळुंके यांच्या पंपावर डिझेल उपलब्ध असल्याने वाहनाच्या लांब लांब लागल्या होत्या.
तसेच, १ मेपासून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आधीच बिघडले असताना, डिझेल तुटवड्याने त्यात आणखी भर पडली आहे.
एकूणच, बीड जिल्ह्यातील डिझेल पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची गरज असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
बीड पुरवठा अधिकारी प्रशांत सुपेकर यांच्याशी संपर्क केला असता आज संध्याकाळपर्यंत बीड शहराला डिझेल,पेट्रोल पुरवठा होणार असल्याची माहिती दिली.









