
बीड | प्रतिनिधी (दि. 21 मार्च 2026)अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड आणि माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत वारोळा (ता. माजलगाव) येथे राहत्या घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AHTUच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना 20 मार्च रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, वारोळा गावात बाहेर जिल्ह्यातील महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली छाप्याचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार AHTU पथक व माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डमी ग्राहक व पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. डमी ग्राहकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता, तेथील एजंट महिलेने वेश्या गमनासाठी ५०० रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे रक्कम दिल्यानंतर इशारा मिळताच पोलीस पथकाने तत्काळ छापा टाकला.
यावेळी अलका हडागाळे (रा. वारोळा) हिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेली ५०० रुपयांची नोट जप्त करण्यात आली. तसेच ठिकाणी दोन पीडित महिला आढळून आल्या. चौकशीत एक महिला परभणी येथील असून तिला रामा गायकवाड (रा. वारोळा) याने फोन करून बोलावल्याचे समोर आले, तर दुसरी महिला छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकाकडून ५०० रुपये घेतले जात असून त्यापैकी ३०० रुपये महिलांना दिले जात असल्याची माहितीही पुढे आली.
पोलीसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता १२ न वापरलेले निरोध जप्त करण्यात आले. आरोपी अलका हडागाळे व रामा गायकवाड हे महिलांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुलकुमार प्रभारी अधिकारी माजलगांव ग्रामीण, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, सहायक पोलीस उप निरीक्षक मीरा रेडेकर, महीला पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस हवालदार अशोक शिंदे, प्रदीप येवले. संजय राठोड, पोलीस शिपाई आकाश कारले. विकास वाघमारे विठ्ठल चव्हाण, सर्व नेमणूक व अ. मा. वा. प्र. कक्ष व पोठा माजलगांव ग्रामीण यांनी केली.






