ब्रेकिंग न्यूज

बीड : ऑनलाईन सट्टा अड्ड्यावर छापा.

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून बीड बायपास परिसरातील शेतामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार सट्टा अड्ड्यावर छापा टाकून सुमारे ₹5,26,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धुळे–सोलापूर महामार्गालगत घाटे यांच्या शेतातील घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम ऑनलाईन सट्टा जुगार खेळत आहेत.

या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी गोविंद राख, राहुल शिंदे, परजणे, अशफाक व वडमारे यांनी दि. 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता सदर ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात वैभव आण्णासाहेब आमटे (वय 21) व अभिषेक भारत आमटे (वय 23, दोघेही रा. खांडे पारगाव, ता. जि. बीड) यांच्यासह आणखी सात इसम आढळून आले. हे सर्वजण लोकांना जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून विनापरवाना LOTUS 365 अ‍ॅपद्वारे विविध खेळांवर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून जुगार खेळत व खेळवत असल्याचे तपासात समोर आले.

पोलीसांनी घटनास्थळावरून लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ₹5.26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित सर्व आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतही ‘महादेव अ‍ॅप’वर सट्टा खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात ऑनलाईन जुगार चालवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button