ब्रेकिंग न्यूज

मांजरसुंबा घाटातील थरारक दरोडा उघड.

अपहरण,कोयत्याचा धाक,एटीएम व ऑनलाइन बँकिंगद्वारे ₹1.80 लाखांची लूट करणारे नेकनूर पोलिसांच्या ताब्यात.

बीड(प्रतिनिधी)मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे तसेच एटीएम कार्ड आणि ऑनलाइन बँकिंगचा गैरवापर करून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नेकनूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दि. 9 जुलै 2026 रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 277/2026 भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी श्रीपाद कृष्णाजी कुलकर्णी (रा. भूम) हे आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना मांजरसुंबा घाट परिसरात आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून वाहन आडवे लावत जबरदस्तीने थांबविले.

त्यानंतर आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू लुटल्या. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीचे एटीएम कार्ड ताब्यात घेऊन त्याचा पासवर्ड मिळविला. त्यानंतर खात्यातून रोख रक्कम काढण्यात आली तसेच मोबाईलवरील ऑनलाइन बँकिंग सुविधेचाही गैरवापर करून विविध व्यवहारांद्वारे सुमारे ₹1.80 लाखांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना इच्छेविरुद्ध विविध ठिकाणी नेऊन बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत नेकनूर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले असून उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके शोधमोहीम राबवत आहेत.

ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस ऑफिसर समीर शेख, उपविभाग  पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळवे यांच्या पथकाने केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button