ब्रेकिंग न्यूज

टोलनाक्या जवळ वाहन अडवून मारहाण करत दोन तरुणांचे अपहरण.

जिओ कंपनीच्या मशिनरीची तोडफोड, ५० ते ६० जणांच्या जमावाकडून हल्ला,पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार

बीड(प्रतिनिधी)वैद्यकिन्ही टोलनाक्याजवळ वाहन अडवून मारहाण करत दोन तरुणांचे अपहरण केल्याचा गंभीर आरोप करत एका शेतकऱ्याने बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

तक्रारदार बंकटसिंग विठ्ठलसिंग ठाकुर (रा. नेकनुर, ह.मु. लिंबागणेश ता. जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा करण बंकटसिंग ठाकुर याला जिओ कंपनीअंतर्गत टेंडरच्या कामासाठी फायबर फ्लाइस मशीन व ओटीटीआर अशी सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीची मशिनरी वाहून नेण्याचे काम मिळाले होते.

दि. २७ मे रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास करण ठाकुर हा मारुती सुझुकी इर्टिगा (MH-43-BB-0232) वाहनातून लिंबागणेश ते पाटोदा मार्गावर मशिनरी घेऊन जात असताना त्याच्यासोबत भाऊ विनायक ठाकुर व रोहन दामोदर हेही वाहनात होते. वैद्यकिन्ही टोलनाक्याजवळ आरोपींनी वाहन अडवून जिओ कंपनीच्या मशिनरीची व वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेत वाहनाचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

तसेच, आरोपींनी ५० ते ६० जणांचा जमाव गोळा करून करण, विनायक व रोहन यांना बेदम मारहाण केली तसेच त्यांचे मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर विनायक याला जबरदस्तीने पाटोदा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तर करण व रोहन यांच्याशी संपर्क तुटल्याने त्यांचे अपहरण करून त्यांना अज्ञातस्थळी डांबून ठेवल्याची भीती तक्रारदाराने व्यक्त केली आहे.

दरम्यान, विनायक ठाकुर याच्याविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६१/२०२६ कलम १०९ बीएनएस अंतर्गत खोटा गुन्हा राजकीय दबावातून दाखल केल्याचाही आरोप अर्जात करण्यात आला आहे.

घटनेच्या वेळी नातेवाईकांनी ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधला असतानाही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून करण ठाकुर व रोहन दामोदर यांच्या कथित अपहरणाबाबत गुन्हा दाखल करावा, तसेच कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button