खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला पुण्यातून ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील नगर रोड परिसरातील कामगार उमेश दळवी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तत्पर हालचाली करत मुख्य आरोपीला पुणे येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे संतप्त वातावरणात काही प्रमाणात शांतता निर्माण झाली असून, पोलिसांच्या जलद तपासाची चर्चा होत आहे.
नगर रोड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये काम करणारे उमेश दळवी यांना दिनांक 24 मे रोजी गंभीर अवस्थेत बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती तसेच शरीरावर मारहाणीच्या खुणा, जखमा आढळल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. मृत उमेश दळवी यांच्या पत्नीने पतीचा मृत्यू नैसर्गिक नसून, ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणच्या मालकाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेख इरफान शेख समद उर्फ लाला याच्यासह अन्य एकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दिनांक २५ मे रोजी शवविच्छेदनानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठेवत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेमुळे शहरातील वातावरण चिघळले होते. विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
घटनेची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला याला पुणे येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, व्यंकटरमण पोलीस उपाधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, मनोज परजणे,राहुल शिंदे,अश्फाक सय्यद चालक नितीन वडमारे स्थानिक गुन्हे शाखेने केली.
सदरील आरोपी हा पुणे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा टीमला मिळाली असता तात्काळ पुणे येथील जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीचा तत्परतेने शोध घेत कारवाई केल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






