पैश्याच्या व्यवहारातून जीवघेणा हल्ला.
फरार हल्लेखोर आरोपी पाली घाटात जेरबंद;बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) – पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून एका व्यक्तीस आहेर वडगाव येथे बोलावून घेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला बीड ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई पाली घाटाजवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी महादेव विश्वनाथ जाधव (वय 55, रा. नांदुर घाट, ता. केज, जि. बीड) यांना पैशाचा व्यवहार मिटवण्यासाठी आहेर वडगाव येथे बोलावण्यात आले होते. मात्र व्यवहार न मिटवता आरोपी हनुमान रखमाजी देवकर व इतरांनी त्यांच्यावर हत्यारांसह लाथाबुक्क्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी जखमी महादेव जाधव यांना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालय, बीड येथे उपचारासाठी दाखल केले. एमएलसी अहवालावरून त्यांचा जबाब नोंदवून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी घटना घडल्यापासून फरार होते. दरम्यान, आरोपी हनुमान रखमाजी देवकर हा पाली घाटाजवळील एका हॉटेलमध्ये बसल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनी बाळराजे दराडे यांनी तात्काळ पोलीस हवालदार सतीश मुंडे, करांडे व दादा सानप यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपीस हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले.
आरोपीस पुढील तपासासाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी बाळराजे दराडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, ग्रामीण पोलीस ठाणे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बाळराजे दराडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक करांडे, पोलीस हवालदार सतीश मुंडे व दादा सानप यांनी केली. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










