मोठी कारवाई ! डीबी पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा.
2.07 लाखांचा मुद्देमाल जप्त,सहा जुगारी ताब्यात.पेठ बीड पोलिसांची दबंग कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड शहर व परिसरात वाढत असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर पेठ बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत बलभीम नगर परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्ते व इतर जुगार साहित्य असा एकूण 2 लाख 7 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बलभीम नगर परिसरात काही जण पत्त्यांच्या माध्यमातून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे रविवारी (दि. 28 जून 2026) सापळा रचून छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान सहा जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपअधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा यांच्यासह पो.नितीन राठोड,पो.ह.अल्ताफ शेख,पो.शिवाजी राख,पो.विष्णू गुजर, पो.पांडुरंग परझणे यांनी कारवाई केली.
शहरात वाढत्या जुगार व्यवसायावर पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पेठ बीड पोलीस निरीक्षण निलेश केळे यांनी स्पष्ट केले आहे.











