मोबाईल चोरीची तक्रार दाखल होताच अवघ्या एक तासात अल्पवयीन चोर ताब्यात.
60 हजारांचा मोबाईल जप्त; बीड शहर पोलिसांची तत्पर कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील सुभाष रोड परिसरातील मोबाईल गॅलरीमधून 60 हजार रुपये किमतीचा सॅमसंग S23 मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा बीड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात शोध लावून मोबाईल जप्त केला. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.
याबाबत शाहीद आमीर शेख (वय 33, रा. काझी नगर, बीड) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख यांचे सुभाष रोड येथे 2015 पासून मोबाईल गॅलरीचे दुकान असून तेथे नवीन व जुन्या मोबाईलची कायदेशीर खरेदी-विक्री केली जाते.
फिर्यादीनुसार, 27 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक युवक दुकानात आला. त्याने सॅमसंग S23 मोबाईल पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्याला मोबाईल दाखवला. त्या वेळी दुकानात ग्राहकांची गर्दी असल्याचा फायदा घेत त्याने मोबाईल पाहत असतानाच तो खिशात टाकून दुकानातून पसार झाला. कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निसटला.
चोरीला गेलेला गुलाबी रंगाचा Samsung S23 मोबाईल (IMEI : 351824512488246 / 352471222488246) हा सुमारे 60 हजार रुपये किमतीचा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मोबाईल चोरीची तक्रार दाखल होताच बीड शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत,सिसटीव्ही माध्यमातून अवघ्या एका तासात अल्पवयीन आरोपीचा शोध घेत त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, बीड शहर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.शहनशहा सय्यद ,पो.बावणकर, पो. अ.इलीयास शेख ,राम पवार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून चोरीस गेलेला मोबाईलही मालकाला परत मिळाल्याने शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले.











