ब्रेकिंग न्यूज

डिझेलचा टँकर रस्त्यावर पलटी !

सुदैवाने स्फोट होण्याचा धोका टळला;सांडलेले डिझेल घेण्यासाठी नागरिकांची कॅन घेऊन झुंबड.

माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ आज सकाळी डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील डिझेल टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिक बादल्या, कॅन, ड्रम तसेच विविध भांडी घेऊन सांडलेले डिझेल गोळा करताना दिसून आले. काहींनी दुचाकींच्या कॅनमध्येही डिझेल भरून नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्याने गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. टँकरचा स्फोट होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. नागरिकांची मोठी गर्दी आणि डिझेल संकलनासाठी सुरू असलेली धावपळ यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनली होती. मात्र सुदैवाने कोणतीही आग किंवा स्फोटाची घटना घडली नाही.

अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच संबंधित प्रशासनाच्या यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, टँकर नेमका कशामुळे पलटी झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button