ब्रेकिंग न्यूज

न.पा.CO फडसे यांना केबिन मध्येच शिवीगाळ,जीवे मारण्याची धमकी !

पोलिसांची कारवाई शून्य;बीडमध्ये पोलिसांचा धाक संपला?

बीड (प्रतिनिधी )बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना नगरपरिषद कार्यालयाच्या केबिनमध्ये घुसून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणी लेखी तक्रार देऊनही तीन दिवस उलटले तरी बीड शहर पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

माहितीनुसार, शेख निजाम आणि शेख इम्रान या दोघांनी एका विषयासंदर्भात नगरपालिकेत तक्रार अर्ज दाखल केला होता. मुख्याधिकारी फडसे यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, त्यानंतरही हे दोघे वारंवार तेच अर्ज घेऊन कार्यालयात येत दबाव टाकत असल्याची माहिती आहे.

७ मे २०२६ रोजी संबंधितांना नियमानुसार चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र यानंतर दोघांनी संताप व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच गोंधळ घातला. “आमचे काम तात्काळ करा”, “फुकट पगार घेताय का?” अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी उद्धटपणे वाद घालत शिवीगाळ व गोंधळ घातला होता. एवढ्यावरच न थांबता,त्यांनी थेट अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी त्याच दिवशी बीड शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप या प्रकरणात एफआयआर दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यालाच कार्यालयात धमक्या दिल्या जात असतील आणि त्यानंतरही तत्काळ कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच आरोपींना राजकीय पाठबळ आहे का?अशीही चर्चा शहरात रंगू लागली आहे. तो व्यक्ती नगरपरिषद कार्यालयात शस्त्र घेऊन आल्याची देखील चर्चा होत असून याची देखील कसून चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “जर मुख्याधिकारीच सुरक्षित नसतील तर आम्ही कसे काम करायचे?” अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. बीड शहरातील वाढत्या दादागिरीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button