बीडमध्ये चेन स्नॅचिंगची दहशत !
डॉक्टर संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन;चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी.

बीड(प्रतिनिधी)बीड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नि.मा.बीड जिल्हा संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अजित जाधव व त्यांच्या पत्नी डॉ. सुहासिनी जाधव यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटनेने मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले.
दिनांक २४ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉ. अजित जाधव हे पत्नीसमवेत दुचाकीवरून जालना रोडने बीडकडे येत असताना गुरुकुल शाळेजवळ मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे सहा तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून नेली. यावेळी दुचाकीला लाथ मारल्याने ते खाली पडले असून त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
डॉक्टर संघटनेने या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी, हिसकावलेली सोन्याची साखळी परत मिळवून द्यावी आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
दरम्यान, आज दिनांक 30 जून मंगळवार रोजी सकाळी आणखी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची माहिती समोर येत असल्याने शहरात चेन स्नॅचिंग करणारी एखादी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.अश्या टोळीचा पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज सर्व डॉक्टरानी पोलीस अधीक्षक कार्यालयात एकत्र येऊन निवेदन दिले.











