गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस ठोकल्या बेड्या.
पेठ बीड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गुन्हेगारांसह अवैध धंद्यावर पोलिसांचा वाढता दबाव.

बीड : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पेठ बीड पोलीस ठाण्याकडून अवैध धंदे, गुन्हेगार तसेच फरार आरोपींविरोधात सातत्याने कठोर कारवाया सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने विविध गुन्ह्यातील आरोपींवर धडक मोहीम राबविल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर पेठ बीड पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये दाखल असलेला फरार आरोपी सय्यद मुक्तार उर्फ मुक्कन सय्यद मंजूर अली यास पोलिसांनी जेरबंद केले. संबंधित आरोपी हा तब्बल सहा महिन्यांपासून फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी डीबी पथकाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
पेठ बीड पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. फरार आरोपी, अवैध धंदे तसेच सराईत गुन्हेगारांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पो.नि.मारोती खेडकर, psi शहा साहेब, पोहवा/ नितीन राठोड, पोहवा/ अजित शिकेतोड, पोअं/ गुजर, पोअं/परजने, पोअं/ गिरी व DB पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.









