धुळे–सोलापूर महामार्गावरील(समनापूर फाट्यावर)लुटमार करणारी टोळी जेरबंद.
बार्शी नाका परिसरातून लूटमार करणारे चार लुटारू ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील समनापूर शिवारात दुचाकीस्वाराला अडवून लुटणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली 23 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून 2026 रोजी रात्री साडेदोन वाजण्याच्या सुमारास राधेश्याम नंदलाल पारीख (वय 42, रा. विप्रनगर, पेठ बीड) हे मोटारसायकलवरून पालीहून बीडकडे येत असताना समनापूर शिवारातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी मारहाण करून त्यांच्या खिशातील 23 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 222/2026 कलम 309(6) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.
त्यानंतर आवेजखान परवेजखान (वय 25), अनिकेत उर्फ चिक्या विश्वास डोंगरे (वय 23), अविनाश शैलेंद्र ससाणे (वय 22) आणि विवेकानंद दिलीप गलांडे (वय 26) या चौघांना बार्शी नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवळे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/अशोक दुबाले, पोह/सोमनाथ गायकवाड, पोह/बाळु सानप, पोह/अर्जुन यादव, पोह/राहुल शिंदे, पोअ.अशफाक सय्यद, पोअ/मनोज परजणे, पोअ/अश्वीन सुरवसे, व चापोह / नितीन वडमारे यांनी केली आहे.











