ब्रेकिंग न्यूज

“तू का मधे पडतोस”म्हणत तरुणाची हत्या.

संतप्त नातेवाईकांनी रात्री रस्ता रोको केल्यावर ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास नवनाथ घुले (वय २५)हा भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्याच्यावरच चाकू हल्ला करण्यात आला त्यात तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास केज-बीड रोडवरील रेणु बार व समोरील बंद असलेल्या समर्थ बिअर बारसमोर हा प्रकार घडला. आरोपी व साक्षीदार यांच्यात सुरू असलेल्या भांडणात विलास घुले मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, “तू का पडतोस?” असे म्हणत आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. यातील आरोपी रामेश्वर गायकवाड याने जिवे मारण्याच्या उद्देशाने विलासच्या पोटात चाकू खुपसल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

विलास घुलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व गावकऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेत शिवाजी चौकात रात्री उशिरापर्यंत रस्ता रोको करण्यात आला यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गंभीर जखमी झालेल्या विलास घुले याच्यावर उपचार सुरू असताना २१ जून रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी केज पोलीस ठाणे परिसरात गर्दी करत शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.

या प्रकरणी मयताचा भाऊ रमेश नवनाथ घुले (रा. टाकळी, ता. केज) यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गुरुबा कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परसराम कदम, दीपक परसराम कदम आणि संतोष नरहरी कदम यांचा समावेश आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button