ब्रेकिंग न्यूज

बनावट खवा कारखान्यावर छापा;अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर.

बनावट खवा साठा नष्ट,गुन्हा दाखल.भेसळखोरात खळबळ

बीड(प्रतिनिधी)शिरूर कासार तालुक्यातील दहीवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त मिठाई व बर्फी तयार करणाऱ्या आस्थापनेवर छापा टाकला. या कारवाईत सुमारे ₹35,536 किमतीचा संशयित साठा जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला, तर भेसळीसाठी वापरला जाणारा Safolite हा पदार्थ आढळून आल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मा.आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार १ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन, बीड आणि शिरूर कासार पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहीवंडी येथील मे. जय श्रीकृष्णा केक अॅण्ड बर्फी या आस्थापनेवर गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला.

तपासणीदरम्यान अस्वच्छ व आरोग्यास घातक वातावरणात बर्फी, मिल्क केक आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. उत्पादनासाठी वापरण्यात येणारा दुधाचा केक, ब्राऊन बर्फी, खोवा, रवा, शुद्ध केलेले पामोलीन तेल, मोतीचूर दाणा आणि Safolite यांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अस्वच्छ वातावरण, साठवणुकीतील नियमांचे उल्लंघन आणि अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत संशय असल्याने संपूर्ण साठा जप्त करून खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला. तसेच संबंधित आस्थापनेला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान Safolite हा भेसळकारी पदार्थ आढळून आल्याने अन्न सुरक्षा अधिकारी अजय गाढे यांनी कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित (वय २२, रा. दहीवंडी) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ चे कलम ५७ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २७४ व २७५ अंतर्गत शिरूर कासार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, गुरुवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षित अन्न व पोषक आहार जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीत आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंडी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्नछत्रांची तपासणी करून वारकऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ अन्न उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचे अधिकाधिक नमुने तपासणीसाठी घेऊन भेसळविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेशही देण्यात आले.

बीड शहर व जिल्ह्यातील दूध,पनीर,तेल,तूप सह इतर खाद्यपदार्थात भेसळ करणारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button