ब्रेकिंग न्यूज

पुन्हा रोड रॉबरी : चाकूचा धाक दाखवत महिलांचे दागिने व रोख रक्कम लंपास.

कार अडवून अज्ञात तिघांचा धाडसी प्रकार; 1 लाख 69 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल लुटला.

बीड (प्रतिनिधी)बीड, दि. ८ : बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात तिघांनी चाकूचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.२५ वाजण्याच्या दरम्यान आहेस्वडगाव शिवारात धुळे–सोलापूर रोडवर ही घटना घडली. फिर्यादी राहुल उद्धवराव पोहेकर (वय ३०, व्यवसाय–व्यापार, रा. नवीन मोंढा, जालना) हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कार (एमएच 21 सीजी 0400) मधून प्रवास करत असताना अज्ञात तीन इसमांनी त्यांना अडविले.

यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीची पत्नी, आई व मावशी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या दरोड्यात फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रोख, मावशीच्या अंगावरील अंदाजे ३१ हजार ५०० रुपयांचे दागिने तसेच आईच्या अंगावरील सुमारे ५० हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं २०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सपोनि दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोउपनि कुकलारे यांच्याकडे सोपविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पहाटेच्या वेळी महामार्गावर घडलेल्या या धाडसी प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button