ब्रेकिंग न्यूज

लाचखोरीला थारा नाही;पैसे मागितल्यास थेट संपर्क साधा” : API साळवे.

नेकनूर पोलिस बळवंतवर ACB कारवाईनंतर API मंगेश साळवे ॲक्शन मोडवर.

बीड( प्रतिनिधी)दोन दिवसांपूर्वी नेकनूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API मंगेश साळवे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत लाचखोरा विरोधात कठोर भूमिका स्पष्ट केली आहे.

नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही कायदेशीर कामासाठी पैसे देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत, तक्रार अर्ज, चौकशी, पडताळणी, परवानगी, कागदपत्रे किंवा इतर कोणत्याही कामासाठी कोणी अधिकारी अथवा अंमलदार पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन साळवे यांनी केले आहे.

“पोलीस दलाची प्रतिमा स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेच्या विश्वासावर आधारित राहावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका API मंगेश साळवे यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच नेकनूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने कारवाई केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर साळवे यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांना थेट आवाहन केल्याने त्यांच्या निर्णयाचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे.

जर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदल्यात पैसे, भेटवस्तू किंवा अन्य लाभ मागत असेल, तर नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवून योग्य ती कारवाई केली जाईल, असा विश्वासही साळवे यांनी नागरिकांना दिला आहे.

नेकनूर पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा API मंगेश साळवे यांनी व्यक्त केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button