धावत्या टिप्पर मधून दगड डोक्यावर पडून तरुण गंभीर जखमी.
प्रकृती चिंताजनक;पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवले.

आरटीओ अधिकारी झोपेत? विना क्रमांकाच्या, क्षमतेपेक्षा जास्त दगड,वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई कधी?
बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोड, नगर रोड आणि जालना रोडवर विना क्रमांकाच्या हायवा (टिप्पर) वाहनांचा सुसाट वेग नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची गंभीर बाब पुन्हा समोर आली आहे. पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा वाहनांवर नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
टिप्पर मधून वाळू,माती, खडी वाहून नेत असताना त्यावर आवरण झाकण्याचा आदेश असताना देखील हा आदेशाची पायमल्ली बीडमध्ये होत असल्याचे दिसत आहे.
गुरुवार, दि. ४ जून रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास बार्शी रोडवर ही गंभीर घटना घडली. अमोल बापूराव रोमन (वय ४०, रा. काबाड गल्ली, बीड) हे दुचाकीवरून घरी जात असताना धावत्या टिप्परमधून अचानक दगड उडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बीड येथील लोटस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी रुग्णालयात मित्रपरिवार,नातेवाईक व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
दरम्यान, संबंधित टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अमोल रोमन हे संदीप भैया यांचे कट्टर समर्थक अशोक रोमन यांचे बंधू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार संदीप क्षीरसागर यांनी तत्काळ लोटस हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीची भेट घेतली डॉक्टर अशी बोलून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.
बीड शहरातून दररोज क्षमतेपेक्षा अधिक माती,दगड व वाळूची वाहतूक करणारे अनेक वाहने आणि टिप्पर विना क्रमांक किंवा नियमबाह्य पद्धतीने व कागदपत्र पूर्तता नसलेले धावताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अशा वाहनांवर पोलीस प्रशासन आणि आरटीओने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“एरवी दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर तत्पर कारवाई करणारे आरटीओ कर्मचारी,अधिकारी व वाहतूक पोलीस, मात्र मोठ्या टिप्पर आणि हायवांवर कारवाई कधी करणार?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






