ब्रेकिंग न्यूज

अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये;भेसळ करणारावर धाडसूत्र.

थंड पेय पिताना सावधान ! मुदतबाह्य लस्सी नष्ट.

 

बीड( प्रतिनिधी)जिल्ह्यात भेसळखोर व प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरू केली असून, मुदतबाह्य अन्नपदार्थ, भेसळयुक्त वस्तू व गुटखा विक्रेत्यांवर धाडीचे सत्र सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री. तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार दिनांक 25 मे 2026 पासून बीड जिल्हाभरात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत केज तालुक्यात विविध आस्थापनांची तपासणी करून मिठाईचे दोन अन्न नमुने घेण्यात आले. पाटोदा तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रांची तपासणी करत दूधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले. तर माजलगाव शहरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा 71 किलो साठा जप्त करण्यात आला. शिरूर शहरात 158 किलो अन्नसाठा, अंदाजे 24 हजार 806 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

दरम्यान, बीड तालुक्यातील वासनवाडी येथील एका लस्सी उत्पादन केंद्रावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थ वापरून लस्सी उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी 102 लिटर लस्सीचा साठा, अंदाजे 8 हजार 125 रुपयांचा माल जागेवरच नष्ट करण्यात आला.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेले सर्व अन्न नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवरही धडक कारवाई सुरू असून, 30 मे रोजी बीड शहरातील एका पानटपरीवर धाड टाकून 2 लाख 60 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. संबंधिताविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच 31 मे रोजी तलवडा येथील पानटपरीवरून 5 हजार 392 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, तर 2 जून रोजी वडवणी येथील किराणा दुकानातून 23 हजार 580 रुपयांचा गुटखा जप्त करून संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने पुढील काळातही भेसळखोर, मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रेते व प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांविरोधात नियमित धाडसत्र सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील भेसळ करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरल्याचे चित्र आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button