ब्रेकिंग न्यूज

विषारी दारू मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्र हादरला.

दारू अड्डे उद्ध्वस्त करा – करुणा मुंडे आक्रमक”

पुण्यातील अवैध विषारी दारू विक्री प्रकरणात झालेल्या मृत्यूंनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवैध दारू, ड्रग्स, चरस, गांजा, अफू आणि माफिया राज वाढत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“राज्यात कुठलीही गंभीर घटना घडली की माध्यमांसमोर येऊन ‘कठोर कारवाई करू’ असे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात माफियांवर कारवाई होते की फक्त पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली जाते?” असा सवाल करुणा मुंडे यांनी उपस्थित केला.

पुण्यातील कात्रज भागातील विषारी दारू प्रकरण हे अलीकडच्या काळातील गंभीर प्रकरण मानले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, कात्रज परिसरासह पुणे व पिंपरी-चिंचवड भागात भेसळयुक्त/विषारी गावठी दारू सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वेगवेगळ्या अहवालांनुसार वाढत गेला असून काही वृत्तांमध्ये २१ ते २४ मृत्यू झाल्याचे नमूद आहे. 

या प्रकरणात समोर आलेल्या महत्त्वाच्या बाबी:

विषारी रसायन (मिथेनॉल) मिसळल्याचा संशय/तपास: जप्त केलेल्या दारूमध्ये धोकादायक रसायन आढळल्याचे वृत्त आहे. मिथेनॉलमुळे दृष्टी जाणे, उलट्या, तोंडाला फेस येणे, शरीर निकामी होणे अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

कात्रज, हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसर तपासाच्या कक्षेत: अवैध दारू विक्रीचे जाळे उघड करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. 

मोठी प्रशासकीय कारवाई: काही पोलीस अधिकारी व उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. काही अहवालांनुसार ९ ते २२ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

गुन्हे दाखल व अटक: अवैध दारू उत्पादन, साठवण आणि विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच, “दारू माफिया, ड्रग्स माफिया, मोठे गुंड आणि अवैध धंदे करणाऱ्यांना राजकीय संरक्षण दिले जाते का? नगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी दिलेल्या संशयित पार्श्वभूमीच्या लोकांवर सरकार कारवाई करणार का?” असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राजकीय स्वार्थासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संरक्षण देत पोलीस यंत्रणेवर खापर फोडण्याचे प्रकार बंद करावेत, अशी मागणी करत त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा, असेही म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू असलेले अवैध दारू अड्डे तात्काळ उद्ध्वस्त करावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा मृत्यूंना जबाबदार असलेल्या साखळीचा पर्दाफाश करावा, व विशाल दारू सेवन प्रकरणी मृत्युमुखी पडल्या कुटुंबीयांना राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्ष करुणा मुंडे यांनी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button