पेठ बीड पोलिसांकडून दुचाकी तपासणी मोहीम.
फॅन्सी नंबर प्लेट,ट्रिपल सीट,मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरवर कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आज दि. १३ मे रोजी अचानक दुचाकी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मोंढा परिसरात पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट, परवाना नसलेले वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच मोठ्या आवाजाचे बुलेट सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाई केली.
अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे वाहनधारकांमध्ये एकच धावपळ उडाली. पोलिसांनी जवळपास दहा दुचाकी ताब्यात घेत पेठ बीड पोलीस ठाण्यात जमा केल्या. काही वाहनांवर तात्काळ नंबर प्लेट बसविण्यात आल्या, तर अनेक वाहनचालकांकडून दंडही वसूल करण्यात आला.
विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान काही अल्पवयीन मुलांकडून दुचाकी व चारचाकी वाहने चालविली जात असल्याचेही निदर्शनास आले. अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे ही गंभीर बाब असून, पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने देताना जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आगामी काळात अशा अल्पवयीन वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवून कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पीएसआय शहा, पोलीस हवालदार अजय सानप, अल्ताफ शेख, विष्णू गुजर, गिरी,मोटे, नितीन राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत फॅन्सी नंबर प्लेट, काळी फिल्म, ट्रिपल सीट प्रवास तसेच लायसन्स व वाहनाची कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांविरोधात पुढेही सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.










