पोलीस कर्मचारी धनंजय सूळ यांची PSI पदी निवड
कष्ट,जिद्द आणि चिकाटीला यश;वडिलांचे स्वप्न साकार.

बीड (प्रतिनिधी) — शिरूर कासार तालुक्यातील खोपटी येथील धनंजय जनार्धन सूळ यांची एमपीएससी मार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली असून त्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धनंजय सूळ हे सन 2014 मध्ये बीड पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. नोकरी सांभाळत त्यांनी अत्यंत कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सलग चार वर्षे अभ्यास करून हे यश संपादन केले.
त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्षही आला होता. सन 2020 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आपल्या मुलाने अधिकारी व्हावे, असे त्यांचे वडिलांचे स्वप्न होते. वडिलांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धनंजय सूळ यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर PSI पदाला गवसणी घातली.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडिलांच्या आशीर्वादाला देत हे यश त्यांच्या चरणी अर्पण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल खोपटी गावासह, मित्रपरिवार व बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






