एका महिन्यातच नालीवरील स्लॅबला भगदाड.
बांधकाम विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यातबार्शी रोडवरील सोमेश्वर नगर प्रवेशद्वारा मधील नाली वरील स्लॅपला भगदाड.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोडवरील सोमेश्वर नगर प्रवेशद्वार परिसरात नालीवरील स्लॅबला अवघ्या एका महिन्यात भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बार्शी नाका चौक दरम्यान रस्त्याचे काम सुरू असताना नाल्यांवर स्लॅब टाकण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण होऊन महिनाही उलटत नाही तोच स्लॅब कोसळू लागल्याने संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला आहे. पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त आहे, पावसाळ्यापूर्वी जर रस्ता झाला नाही तर बार्शी रोडवर स्विमिंग पूल होण्याची शक्यता आहे.
सदर भगदाडामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि पादचारी यांना जीव धोक्यात घालून या मार्गाने जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
दरम्यान, इतक्या कमी कालावधीतच स्लॅब खराब होणे म्हणजे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. बांधकाम विभागाने केवळ कागदोपत्री कामे पूर्ण केल्याचे दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष दर्जेदार काम करण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांचा रोष अनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




