विवाहितेवर अमानुष मारहाण;जखमी अवस्थेत आढळली पीडिता.
सामाजिक कार्यकर्त्यां सारिका गायकवाडनी पीडितेचे प्राण वाचवून दिले माणुसकीचे दर्शन.

बीड, (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील उमापूर येथे एका २८ वर्षीय विवाहितेवर सासरच्या मंडळींकडून झालेल्या अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूनम कापसे असे या पीडित महिलेचे नाव असून, त्या बीड बसस्थानक परिसरात अत्यंत गंभीर आणि हलाखीच्या अवस्थेत आढळून आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम कापसे यांना पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी घरगुती वादातून निर्दयपणे मारहाण केली. या सततच्या छळाला कंटाळून त्या आपल्या लहान मुलीसह बीड येथे आल्या होत्या. मात्र, बसस्थानक परिसरात त्या जखमी आणि असहाय अवस्थेत आढळल्या.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सारिका गायकवाड आणि पोलीस बॉय संघटनेच्या युवती जिल्हाध्यक्ष समीक्षा वाघमारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी विलंब न करता पीडित महिला आणि तिच्या मुलाला स्वतःच्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सध्या पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, वेळेत मिळालेल्या मदतीमुळे तिचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे. भररस्त्यात कोणीही मदतीसाठी पुढे येत नसताना या महिला कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, “कौटुंबिक हिंसाचार सहन करू नका. महिलांनी पुढे येऊन मदत मागावी, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा संदेश सारिका गायकवाड आणि समीक्षा वाघमारे यांनी दिला आहे.
तसेच कोणी अत्याचार करत असेल किंवा छेडछाड करत असेल तर आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता सर्व गायकवाड यांनी केले आहे.






