ब्रेकिंग न्यूज

रस्त्यांवरील कचखडी टाकल्याने गाड्या स्लिप होऊन दुचाकीस्वार जखमी.

रिपाई शहराध्यक्ष अविनाश जोगदंड गंभीर जखमी;नगरपालिका विरोधात तक्रार दाखल करणार.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील प्रमुख रस्त्यांवर नगरपालिकेकडून टाकण्यात आलेल्या कचखडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काल दिवसभरात सुमारे शंभर ते सव्वाशे लोक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांच्या गुडघ्यांना दुखापत झाली असून काहींच्या हनुवटीला जखमा झाल्या आहेत, तर काही जणांना फ्रॅक्चरही झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

नगरपालिकेच्या या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित कामात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत अभियंता किरण देशमुख यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच, या प्रकरणी सत्ताधाऱ्यांची जबाबदारीही तितकीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणुका निघणार असताना, बशीरगंज ते बलभीम चौक या महत्त्वाच्या मार्गावर अनेक खड्डे असल्याने खड्डे बुजवण्यासाठी  कचखडी टाकण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्यांची डागडुजी करण्याच्या नावाखाली आधीपेक्षा अधिक खराब स्थिती निर्माण केल्याचा आरोपही होत आहे. बीड शहर खड्डे मुक्त करण्याचा दावा या निमित्ताने फोल ठरल्याचे देखील समोर आले आहे.

सुभाष रोडवरील अॅड. थिगळे यांच्या घरापासून ते प्रेस लाईनपर्यंत मोठ्या प्रमाणात कचखडी टाकण्यात आली असून, वाहन चालवणे कठीण झाले आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. याचप्रमाणे बशीरगंज ते बलभीम चौक मार्गावरही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बीड जयंती उत्सव समितीचे आयोजक व रिपाइं शहर अद्यक्ष अविनाश जोगदंड हे देखील कचखडीवर घसरून जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर त्यांनी नगरपालिकेविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला असून, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे.

या सर्व प्रकारामुळे संतप्त नागरिकांकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button