मस्साजोग मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ.
सात घरावर दरोडा;स्व.संतोष देशमुख यांच्याही घरी चोरी.

बीड( प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोग गावात मध्यरात्री घडलेल्या घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरासह सुमारे सात ते आठ घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला.
माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरांमध्ये शिरकाव केला. त्या वेळी देशमुख कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत होते. सकाळी उठल्यानंतर घरातील कपाटे फोडलेली व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. ही बाब लक्षात येताच तातडीने पोलिसांना कळविण्यात आले.
घटनेनंतर केज पोलीस, बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. प्राथमिक चौकशीत गावातील इतर काही घरांमध्येही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला असून काही ठिकाणी मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “आमच्या घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत; मात्र कपाट फोडून सर्व वस्तू अस्ताव्यस्त करण्यात आल्या. आमच्यासह गावातील सात ते आठ घरांमध्ये चोरी झाली असून काहींना आर्थिक फटका बसला आहे.”
या सलग घरफोड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घ्यावा, एकाच गावामध्ये सात ठिकाणी चोरी झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पोलिसांनी तात्काळ चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.










