ब्रेकिंग न्यूज

तरुणाची चिट्ठी लिहून आत्महत्या.

प्रेम प्रकरणातून मुलीच्या घरच्यांनी मारलं;चोरीचा आरोप केल्याने घेतला गळफास.

बीड (प्रतिनिधी) – तालुक्यातील मांजरसुंबा येथील 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 29 मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणात प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण व धमक्या दिल्यामुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23, रा. मांजरसुंबा, ता. जि. बीड) हा तरुण 29 मार्च रोजी सकाळी मांजरसुंबा येथील ‘हॉटेल नशीब’ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला.

तपासादरम्यान मृताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत संबंधित तरुणाने प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख करत, मुलीच्या कुटुंबीयांकडून मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर खोटा चोरीचा आरोप करून बदनामी केल्याचाही उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे.

मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 मार्च रोजी सकाळी ससेवाडी येथील प्रांजल उंदरे हिचे वडील, चुलते व भाऊ यांनी ज्ञानेश्वर याला पकडून मारहाण केली, शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकारामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button