जमावाकडून तरुणावर प्राणघातक हल्ला;प्रकृती गंभीर.
लोखंडी रॉडने मारहाण डोक्यावर 13 टाके,बरगड्या मोडल्या;पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.

बीड (प्रतिनिधी) : गेवराई शहरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतरही आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास शेख अरबाज शेख जब्बार (रा. तय्यब गल्ली, गेवराई) हा तरुण उपास सोडण्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून कुटुंबासोबत घराबाहेर पडला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा देखील होता.
दरम्यान, गेवराईतील राजगल्ली परिसरात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि अचानक 15 ते 20 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या बेदम मारहाणीत त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून बरगड्या मोडल्या आहेत. तसेच डोक्याला गंभीर मार लागून 13 टाके घालावे लागले आहेत. गेवराई पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही
जखमी अवस्थेत त्याला प्रथम गेवराई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
गेवराई शहरातील मुख्य भागातच गंभीर घटना घडूनही मुलींचा कडून हल्लेखोरांना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे गेवराई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून “पोलिसांचे भय संपले का?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जखमी तरुणाच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.






