सलग दोन दिवस जीवघेणा हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात.
आरोपी 48 तासांत अटकेत;बीड शहर पोलिसांची तत्पर कारवाई.

बीड (प्रतिनिधी): बीड शहरातील सहयोग नगर परिसरात सर्वेश्वर मंदिराजवळ भरदिवसा झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपीला बीड शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिनांक 15 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून बीड शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली की, सर्वेश्वर मंदिराजवळ चार महिला व एका पुरुषाने एका व्यक्तीस बेदम मारहाण केली आहे. माहिती मिळताच PSI संदीप नेवरे व PSI महेश जाधव हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
तपासात समोर आले की, सदाशिव धोंडिबा कोकाट (रा. पांडुरंग नगर, बहिरवाडी, बीड) हे आपल्या मुलासोबत सामान्य रुग्णालयाकडे जात असताना दोन महिला आरोपींनी त्यांना अडवून मोटारसायकलची चावी काढून घेतली. वयोवृद्ध असल्याने पुढे जाऊ देण्यास विरोध करण्यात आला. त्यानंतर संबंधित महिलांनी प्रमुख आरोपीला घटनास्थळी बोलावून घेतले. सर्व आरोपींनी मिळून भर रस्त्यात कोकाट यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर बोथट वस्तूने वार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध झाल्याने गुन्हा नोंदविणे व पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत झाली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीही याच पीडितावर गंभीर हल्ला झाल्याची नोंद असून त्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 326 अन्वये गुन्हा दाखल आहे.
सलग दोन दिवस सार्वजनिक ठिकाणी गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारतीय दंड विधान कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकी उर्फ पवन किशोर वीर (रा. नवनाथ नगर, MIDC, बीड) यास 48 तासांच्या आत अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षी व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
शहरात दहशत निर्माण करणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुढील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.










