ब्रेकिंग न्यूज

बीडमधील व्यसनमुक्ती केंद्र की लुटारूंचा अड्डा ?

ग्रामसेवकाला व्यसनमुक्ती केंद्रात बळजबरीने डांबून आर्थिक लूट; पत्नीवर कटाचा आरोप.

 जिल्हाधिकारी साहेब व्यसनमुक्ती केंद्राला लगाम घाला.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील काही खासगी व्यसनमुक्ती केंद्रे ही उपचारासाठी आहेत की नागरिकांची लूट करणारी अड्डे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची आर्थिक पिळवणूक व मारहाण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याकडे आरोग्य व समाजकल्याण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

असाच एक खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला असून, कोणतेही व्यसन नसताना एका ग्रामसेवकाला त्यांच्या पत्नीने संगनमत करून थेट व्यसनमुक्ती केंद्रात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालमत्ता हडपण्यासाठी व आर्थिक वादातून हा कट रचल्याचा दावा पीडित ग्रामसेवकाने केला आहे.

पीडित ग्रामसेवक घरी असताना चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. “तुम्हाला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बोलावले आहे” असे खोटे सांगून त्यांना बळजबरीने गाडीत बसवण्यात आले. मात्र पोलीस ठाण्याऐवजी त्यांना थेट एका खासगी व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन तिसऱ्या मजल्यावर कोंडून ठेवण्यात आले.

कायदेशीर हस्तक्षेपाने सुटका :

या घटनेनंतर पीडिताच्या भावांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे पीडित ग्रामसेवकाची त्या केंद्रातून सुटका करण्यात आली. सुटका करण्यापूर्वी संबंधित केंद्राने १६ हजार ४०० रुपये फी म्हणून बळजबरीने वसूल केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे आपले शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत पीडिताने पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच मानवी हक्क आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली असून केंद्राचे संचालक व पत्नीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

चौकशीची मागणी, आरोप-प्रत्यारोप

या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत विधी सेवा प्राधिकरणाने याबाबत अहवाल मागवला असल्याची माहिती दिली. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तेजस घुमरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, पत्नीने रीतसर शपथपत्र व पुरावे दिल्यानंतरच प्रवेश देण्यात आल्याचा दावा केला आहे. तक्रारीत तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेण्यासाठी 20,000 ते 25,000 हजार रुपये घेतले जात असून यावर कोणाचाही अंकुश नसल्याने व्यसनमुक्ती केंद्र आर्थिक लूट केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठराविक रक्कम आकारून व सर्व नियम व अटी लावून प्रवेश दिला जावा अशी देखील मागणी होत आहे.

या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी बीड मधील, नियमबाह्य  व विनापरवाना सुरू असलेल्या व तक्रारग्रस्त व्यसनमुक्ती केंद्रांची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी व कायमस्वरूपी परवाने रद्द करावेत,अशी जोरदार मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button