वाघिरा फाट्यावर भीषण अपघात.
सैन्यात भरती झालेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत.देशसेवेचे स्वप्न अधुरे;वाघिरा गावावर शोककळा

लिंबागणेश (प्रतिनिधी)अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघिरा फाट्यानजीक बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने वाघिरा गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील संदिपान भगवान बांगर (वय २०) हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदिपान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
संदिपान बांगर हे नुकतेच भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवकाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोक व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.











